टंचाईचा आढावा, जून अखेरपर्यंत पाणीपुरवठा नियोजनाचे परिपूर्ण प्रस्ताव पाठवा - जिल्हाधिकारी

 0
टंचाईचा आढावा, जून अखेरपर्यंत पाणीपुरवठा नियोजनाचे परिपूर्ण प्रस्ताव पाठवा - जिल्हाधिकारी

टंचाई आढावाःजून अखेरपर्यंत पाणीपुरवठा नियोजनाचे परिपूर्ण प्रस्ताव पाठवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) जिल्ह्यातील टंचाई स्थितीचा मुकाबला करतांना पिण्याच्या पाण्याचे उपलब्ध स्रोत, पाण्याची दैनंदिन गरज याचे अनुमान घेऊन जून अखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन तालुकास्तरावर करावे व तसा परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना दिले.

 जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज बैठक घेऊन टंचाईचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. पी. पी. झोड, भूजल सर्व्हेक्षणचे जीवन बेडवाल, कार्यकारी अभियंता अजित वाघमारे, साह. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. रामदास इंगळे, पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद डी.के. बिडेब, तहसिलदार पल्लवी लिगदे तसेच दुरदृष्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी स्वामी यांनी सर्वप्रथम पाणीटंचाई संदर्भात आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा, अधिग्रहित विहीरी, लाभक्षेत्रातील विहिरींच्या अधिग्रहणाबाबत भुजल अधिनियमातील तरतूदी तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतूदींना अनुसरून प्रस्ताव पाठवावे. पाण्याचा अतिरिक्त वापर थांबवावा, असे निर्देश श्री. स्वामी यांनी दिले.

 टॅंकरने पाणी पुरवठा करतांना टॅंकरला जीपीएस लावण्यात यावे. टॅंकरच्या फेऱ्यांचे नियोजन करावे. त्याचे गावात रजिस्टर ठेवून त्यावर गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्या. लॉगबुक तयार करावे.टॅंकरच्या फेऱ्या व टॅंकर भरण्याचे ठिकाण या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करावी.जिल्ह्यात टंचाई उपाययोजना राबवितांना जलपुनर्भरण, गाळ काढणे अशी कामे प्राधान्याने घ्यावी. जेणेकरुन पुढील वर्षात टंचाई निर्माण होणार नाही,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

 चारा उपलब्धतेबाबत माहिती घेतली. चारा उपलब्धतेबाबत पशुसंवर्धन विभागाने खात्री करावी व जिल्ह्यात सर्वत्र समान पद्धतीने चारा उपलब्ध होईल या पद्धतीने नियोजन करावे. त्यासाठी समान तत्वावर पशुधनाच्या संख्येनुसार चारा उपलब्ध करुन देण्याबाबत माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. तसेच चारा उपलब्धतेबाबत तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष सुरु करण्यात यावा. जिल्ह्यातील चारा बाहेर नेऊ नये असे आदेश जिल्हाप्रशासनाने जारी केले आहेत. त्याआदेशानुसार जिल्ह्यातील चारा बाहेर वाहतुक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तसे पोलिसांना कळवावे. पशुधनासाठीही पिण्याच्या पाण्याची सोय करावी असेही निर्देश त्यांनी दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow