शेणखत, चारा उत्पादनाने दुग्ध व्यवसाय फायदेशीर - राज्यपाल हरिभाऊ बागडे
गोसंवर्धन सहकारी दुध संघ सुवर्ण महोत्सवी गौरव सोहळा...
शेणखत;चारा उत्पादनाने दुग्ध व्यवसाय फायदेशीर- राज्यपाल हरिभाऊ बागडे
दुग्धोत्पादनातून येईल मराठवाड्यात समृद्धी-राधाकृष्ण विखे पाटील
छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.21(डि-24 न्यूज)- दुग्धोत्पादन करतांना मिळणारे शेणखताचा पर्यायी खत म्हणून केलेला वापर आणि स्वतः पशुपालकाने आपल्या जनावरांसाठी केलेले चारा उत्पादन केल्यास दुग्धव्यवसाय हा फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो,असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी केले.
शासनाने दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी आणि दुधाळ जनावरांसाठीही अनुदान दिले आहे. त्याचा लाभ घेऊन मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायाकडे लक्ष दिल्यास मराठवाड्याची प्रगती होऊन समृद्धी येईल, असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केले.
चित्ते पिंपळगाव येथे गोसंवर्धन सहकारी दूध संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, खासदार संदिपान भुमरे, संचालक राजेंद्र जयस्वाल, रामू काका शेळके, जगन्नाथ काळे यांच्यासह गोसंवर्धन सहकारी दूध संघाचे संचालक मंडळ व सदस्य उपस्थित होते.
श्री.विखे पाटील म्हणाले की, ग्रामीण भागाचा विकास होण्यात सहकार चळवळीचा मोठा हातभार आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आणि शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी सहकार चळवळ महत्त्वपूर्ण ठरली आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन दुग्ध व्यवसायाकडे वळावे. मराठवाड्यात दूध उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. हे करतांना आपल्या दूध विकास संस्था किंवा दूध संघ हे टिकवले पाहिजेत. शासनाने मराठवाड्यातील दूध उत्पादनासाठी तसेच दुधाळ जनावरांच्या वाटपासाठी अनुदानही देऊ केले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील दूध उत्पादन व त्यायोगे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे हा हेतू आहे. दुध हे शुद्ध व निर्भेळ असायला हवे. त्यामुळे दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र दूध भेसळ करणाऱ्या विरुद्ध शेतकऱ्यांनी आणि दूध संघाने ही भूमिका घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यपाल हरीभाऊ बागडे म्हणाले की, सर्व सभासदांनी गोसंवर्धन सहकारी दूध संघाची स्थापना आलेल्या विविध अडचणी आणि दूध उत्पादन, विक्री, वितरण या संदर्भातल्या विविध आठवणींना उजाळा दिला. शेतकऱ्यांना दूध उत्पादनाचा खर्च हा रासायनिक खताला पर्याय म्हणून शेणखत या सेंद्रिय खताचा उपयोग केल्यानंतर त्यांचा उत्पादन खर्च हा निघून फायद्याची शेती व दूध उत्पादन ठरू शकते. शेतकऱ्याने दूध उत्पादन करताना जनावरांसाठी आवश्यक असलेला शेत चारा आपल्याच शेतामध्ये पिकवून त्याचा उपयोग केला तर दुधाचा उत्पादन खर्च हा कमी होऊन जास्तीत जास्त नफा मिळू शकतो असे त्यांनी सांगितले.
खासदार संदिपान भुमरे यांनी गोसंवर्धन दूध उत्पादन शेतकऱ्यांना दूध उत्पादन सहकारी संस्थेने शेतकऱ्यांना आर्थिक विकासाचा मार्ग दिला असल्याचे प्रतिपादन केले. प्रमाणिकपणे प्रयत्न केल्यामुळे गोसंवर्धन दूध संस्था पन्नास वर्षाचा टप्पा गाठू शकले ही एक जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले .संस्थापक हरिभाऊ बागडे यांनी या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर वेळोवेळी भूमिका घेऊन शेतकऱ्यांचे हित करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही भुमरे यांनी सांगितले.
गो संवर्धन दूध उत्पादन संघाचे संचालक मंडळातील सदस्य राजेंद्र जयस्वाल, रामू काका शेळके, जगन्नाथ काळे, यांच्यासह अमोल गावंडे, अंबादास बागडे, भाऊराव गावंडे, मारुती गावडे यांचा सत्कार करण्यात आला. जास्त दूध संकलन करणाऱ्या सुखदेव बागडे, संजय झिंजुर्डे, नारायण कसबे, शंकर शेजुळ, धुरपताबाई लंगडे या शेतकऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले
.
What's Your Reaction?