सद्भावना मंचच्या वतीने एकतेचा संदेश देण्यासाठी कृती आराखडा तयार...

सद्भावना मंचच्या वतीने एकतेचा संदेश देण्यासाठी कृती आराखडा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)- अलिकडच्या काळात प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.) यांच्याविषयी प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणारे पोस्टर्स व बॅनर्स हे शांततेचे आणि श्रद्धेचे प्रतीक असूनही, त्यावर अन्यायकारक कारवाई, अटक व एफआयआर नोंदविले जात असल्याने मुस्लिम समाजात गंभीर वेदना आणि चिंताजनक बाब निर्माण झाली आहे. अशा कृतींमुळे जातीय सलोखा, सामाजिक ऐक्य आणि आपल्या राष्ट्राची जडणघडण यावर दूरगामी व धोकादायक परिणाम होऊ शकतात. यासंबंधी आम्ही जनतेसमोर आणि प्रशासनिक अधिकाऱ्यांसमोर नम्रपणे काही मुद्दे मांडू इच्छितो अशी माहिती पत्रकार परिषदेत सद्भावना मंचच्या वतीने किर्तनकार नितीन सावंत महाराज यांनी माहिती देत सांगितले राज्यात एकता, बंधुता, भाईचारा वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम घेत जनजागृती करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे.
याप्रसंगी जमात-ए-इस्लामी हिंदचे महाराष्ट्र अध्यक्ष मौलाना इलियास फलाही, जमात-ए-इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष डॉ.सलमान मुकर्रम सिद्दीकी, डॉ.रफीक पारनेरकर, अनंत भवरे, इंजिनिअर वाजेद कादरी उपस्थित होते.
माहिती देताना मौलाना इलियास फलाही यांनी सांगितले भारत हे विविध धर्म, जाती, पंथ आणि परंपरांनी नटलेले राष्ट्र आहे. प्रत्येकाची श्रद्धास्थाने, प्रेषित, संत, महात्मे व आदरणीय व्यक्तिमत्वे ही सर्वांसाठी मान आणि प्रतिष्ठा मिळविण्यास पात्र आहेत. त्यांच्या भावनांचा अपमान होऊ नये, तर संवेदनशीलतेने सन्मान व्हावा, यासाठी प्रयत्नशील रहावे.
पैगंबर मुहम्मद (सल्ल.) सर्व मानवतेचे हितकारक होते. त्यांचे जीवन आणि शिकवण जगभरातील कोट्यवधी लोकांना करुणा, न्याय आणि शांतीच्या मूल्यांनी प्रेरित करत आहेत. समाजसुधारणेचे ईश्वरीय मार्गदर्शन त्यांच्या मार्फत या जगाला भेटलेले आहे. त्यांचे जीवन चरित्र आणि संदेश मानवकल्याणासाठी सदैव मार्गदर्शक राहतील आणि आहेत.
"मी मुहम्मद (सल्ल.) यांच्यावर ’’ प्रेम करतो" असे म्हणणे त्यांच्याप्रती अतुट प्रेम आणि श्रद्धा दर्शविते. जे की प्रत्येक प्रेषितांच्या अनुयायाला असे म्हणणे नैसर्गिक आणि संवैधानिक अभिव्यक्ती प्राप्त आहे. ज्याप्रमाणे लोक मुक्तपणे आपल्या श्रद्धास्थानांप्रती हातावर फोटो काढतात, समाजमाध्यमांवर त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करतात. त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांना देखील मुक्तपणे पैगंबरावरील प्रेम प्रकट करण्याचा नैसर्गिक आणि संवैधानिक अधिकार आहे.
या श्रद्धाभिव्यक्तीला सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका मानून त्यावर एफआयआर नोंदविणे किंवा अटक करणे हे अत्यंत अन्यायकारक आहे. हे भारताच्या बहुलतावाद, सहिष्णुता आणि परस्पर आदर या मूलभूत मूल्यांवर घाला घालणारे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारे आहे. अशी कोणतीही कारवाई देशहिताच्या विरोधात आहे.
वातावरण जाणूनबुजून बिघडवण्याचा आणि समुदायांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजविरोधी घटकांनी ओळखले पाहिजे आणि त्यांच्यावर कार्यवाही केली पाहिजे. दुर्दैवाने, प्रत्येक निवडणुकीच्या काळात, अल्पकालीन फायद्यासाठी अविश्वास निर्माण करण्याचा आणि समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. ही धोकादायक प्रवृत्ती लोकशाही संस्थांना नष्ट करते आणि संवैधानिक मूल्यांना कमकुवत करते.
सर्वच बांधवांशी निष्पक्षतेने वागण्याची आणि शांततेने श्रद्धा व्यक्त करणाऱ्या निष्पाप मुस्लिमांना त्रास देऊ नये अशी विनंती आम्ही शासन व पोलिस प्रशासनास करतो. खोडसाळपणा करणाऱ्यांनी केलेल्या अवैध तक्रारी आणि एफआयआरना परवानगी देणे हे समाजात फूट पाडू इच्छिणाऱ्यांनाच प्रोत्साहन देते.
आम्ही सरकार आणि जनतेला विनंती करतो की त्यांनी अशा बाबी संवेदनशीलतेने हाताळाव्यात आणि देशाच्या संवैधानिक मूल्यांचे, परस्पर आदराचे आणि बंधुत्वाचे समर्थन करावे. भारताची खरी ताकद त्याच्या संविधानात, त्याच्या बहुलतावादात, सहिष्णुतेत आणि शतकानुशतके सहअस्तित्वाच्या परंपरेत आहे. या मुल्यांना कमकुवत करणे म्हणजे केवळ एका समुदायाचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नुकसान करणे होय.
आपण सर्वजण मुहम्मद सल्ललाहु अलैहि व सल्लम यांच्यावर प्रेम करतो. हा इस्लामिक श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. आणि आमचे त्या सर्व मुस्लिम बांधवांना देखील विनंती आहे की, त्यांनी प्रेषितांच्या शिकवणी आचरणात आणून खरे प्रेम व्यक्त करावे, ज्याचा समस्त मानवकल्याणाला हेवा वाटेल.
What's Your Reaction?






