उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मशाल चिन्ह न दिल्याने वाद, थेट निवडणूक आयुक्तांना फोन...
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मशाल चिन्ह न दिल्याने वाद...
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अंबादास दानवे यांनी विचारला जाब
राज्य मुख्य निवडणूक आयुक्त व मनपा आयुक्तांशी थेट फोनवर साधला संवाद...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज):- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 4 मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार सावित्रीबाई हिरालाल वाणी यांना उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही मशाल हे अधिकृत निवडणूक चिन्ह देण्यात आले नाही. या गंभीर प्रकाराविरोधात महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते व शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.
उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे हे निवडणूक यंत्रणेचे घटनात्मक कर्तव्य असताना, जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मशाल चिन्ह न मिळाल्यामुळे उमेदवाराच्या प्रचार प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून हा प्रकार लोकशाही मूल्यांवर तसेच न्यायालयाच्या आदेशावर गंभीर आघात करणारा असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाची दखल घेत अंबादास दानवे यांनी राज्य मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे तसेच मनपा आयुक्त तथा महानगरपालिका निवडणूक अधिकारी यांच्याशी थेट फोनवरून संवाद साधला. उच्च न्यायालयाचा आदेश असूनही उमेदवाराला चिन्ह न दिले जाणे हे अत्यंत गंभीर असून तात्काळ आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली.
“उच्च न्यायालयाचा आदेश डावलण्याचा अधिकार कोणालाही नाही. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि कायद्याच्या चौकटीतच पार पडली पाहिजे. अन्यथा शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंदोलन करेल असा गंभीर इशारा दानवे यांनी यावेळी दिला.”
या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, न्यायालयीन आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून उमेदवार सौ. सावित्रीबाई हिरालाल वाणी यांना मशाल चिन्ह देण्यात यावे, अशी जोरदार मागणी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उमेदवारांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?