खुशखबर...सिध्दार्थ उद्यानात नवे पाहुणे सिंह, अस्वल, कोल्ह्यांची भर...

सिद्धार्थ उद्यानात नवे पाहुणे – सिंह, अस्वल आणि कोल्ह्यांची भर!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) -
बदल्यात वाघांची अदलाबदल
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीनुसार कर्नाटकातील शिवमोगा येथून 2 सिंह, 2 अस्वल आणि 2 कोल्हे सिद्धार्थ उद्यानात आणण्यात आले. त्याच्या मोबदल्यात येथून 01 पांढरे नर वाघ आणि 2 पिवळ्या वाघीण शिवमोगा प्राणीसंग्रहालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
लांब प्रवासानंतर सुरक्षित आगमन
दि. 25 जून रोजी रात्री 8 वाजता शिवमोगा येथून प्राण्यांची जोडी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. नागेश बलेगर व पशुवैद्यक डॉ. मुरली मनोहर यांच्या देखरेखीखाली रवाना झाली होती. तब्बल दोन दिवसांच्या प्रवासानंतर आज दि. 27 जून रोजी सकाळी 8 वाजता हे प्राणी सुरक्षितपणे सिद्धार्थ उद्यानात दाखल झाले.
आरोग्य तपासणी आणि विशेष व्यवस्था
प्राणी सिद्धार्थ उद्यानात सुरक्षितरीत्या उतरविण्यात आले व त्यांच्या निवासासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या त्यांना नियमित खाऊ-पाणी दिले जात असून सर्वांची आरोग्य तपासणीही पूर्ण झाली आहे. अस्वलांच्या पिंजऱ्यात झोका व खेळणी उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांची 24 तास देखरेख करण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत.
प्रेक्षकांसाठी थोडी प्रतीक्षा
स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी पुढील 2 ते 3 दिवस प्रेक्षकांना हे प्राणी पाहता येणार नाहीत. त्यानंतरच नागरिकांना सिंह, अस्वल आणि कोल्ह्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
What's Your Reaction?






