बनावट व बोगस औषधी घोटाळ्याची सिआयडी चौकशी करण्याची इम्तियाज जलील यांची मागणी

 0
बनावट व बोगस औषधी घोटाळ्याची सिआयडी चौकशी करण्याची इम्तियाज जलील यांची मागणी

बनावट व बोगस औषध घोटाळ्याची सीआयडी मार्फत चौकशी करा – मा.खासदार इम्तियाज जलील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक व सीआयडी प्रमुख यांच्याकडे केली मागणी; औषध प्रशासनावर ही केला संशय व्यक्त

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असलेल्या बनावट व बोगस औषधांचा राज्यभर पुरवठा होऊन झालेल्या महाघोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असल्याने त्याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसेच पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक तथा सीआयडी प्रमुख यांनासुध्दा पत्र पाठविले.  

          मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असलेल्या बोगस औषधांचा महाघोटाळा समोर आला आहे. औषधी निष्क्रिय व बनावट असल्याचे उघडकीस आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

          इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले की, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील औषधी भांडारातून 10 ऑगस्ट 2023 रोजी चाचणीसाठी औषधी नमुने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल वर्षभरानंतर ऑक्टोबरमध्ये आला. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तोपर्यंत 25 हजार 900 गोळ्यांचे वितरण झाले होते. राज्यभरात चार कंपन्यांकडून तब्बल 85 लाख बनावट गोळ्यांचे वाटप झाले आहे. याशिवाय आणखी किती बनावट गोळ्या शिल्लक आहेत अथवा वितरीत झालेल्या आहेत. राज्यातील इतरही शासकीय रुग्णालयात असा प्रकार घडला आहे का ? याची उच्चस्तरीय सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

          अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास बनावट औषधींचा पुरवठा करणार्‍या कोल्हापूरच्या मे.विशाल एंटरप्रायजेसने औरंगाबाद मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) तब्बल 33 प्रकारच्या औषधींचा पुरवठा केल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय राज्यात विविध ठिकाणी बोगस औषधींचा पुरवठा करणारे अनेक एजन्सी असल्याची दाट शक्यता व्यक्त केली.  

          पूढे नमुद केले की, वैद्यकीय क्षेत्रात बॉम्बे मार्केटच्या (बीएम) औषधींचा व्यवसाय झपाट्याने वाढतोय. राज्यातील हजारो काउंटरवर बोगस औषधींची विक्री धूमधडाक्यात सुरु आहे. बीएम मार्केटचा व्यवसाय दरवर्षी शकडो कोटीपर्यंत पोहोचला असुन काही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, मेडिकल स्टोर तसेच वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित काही एजन्सी व संस्था या व्यवसायाला पाठबळ देत असल्याची धक्कादायक माहिती विविध वृत्तमानपत्रातुन समोर येत आहे. 

          मानवी शरीरासाठी ही औषधी घातक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तीन रुपयांच्या इंजंक्शनवर या कंपन्या 1200 रुपये एमआरपी टाकतात. सामान्य काउंटरवर विक्री करणार्‍या मेडिकल चालकाला ते फक्त सात रुपयांना येते. त्यामुळे ते 80 ते 90 टक्के सुट देऊनही मोठ्या प्रमाणात पैसा कमावत आहेत. सर्वसामान्य नागरिक बॉम्बे मार्केटची औषधी ओळखूच शकत नाही, असाही या क्षेत्रातील तज्ज्ञांचा दावा आहे.

          राज्यभरात बनावट औषधींचा प्रकार सुरु असतांना रिअ‍ॅक्शन आली तर तपासणी, तक्रार आली तर तपासणी अशी भूमिका औषध प्रशासन घेत असल्याचे माहिती मिळाली आहे.

          रुग्णालयात बनावट औषध निर्मिती व विक्रीचे जाळे आंतरराज्य पातळीवर असण्याची शक्यता आहे. औषधीसाठी वापरलेले मटेरियल निकृष्ट दर्जाचे, पॅकेजिंगकडे लक्ष नाही, काही दिवसांतच औषधींचा भूसा होतो. या औषधींचा रुग्णाला फायदा नव्हे, उलट नुकसानच आहे. या औषधांची निर्मिती कोठे झाली, त्यासाठी लागणारा कच्चा माल, पॅकिंग मटेरिअल साहित्य कोठून आणले, त्याची मार्केटिंग कुणी केली, या औषधांचा राज्यातील कोणकोणत्या शासकीय रुग्णालय आणि मेडीकल स्टोरवर पुरवठा झालेला आहे, याचा उच्चस्तरीय तपास होणे गरजेचे असल्याचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले.

माजी आयुक्त (सनदी अधिकारी) यांची मदत घ्यावी

          अन्न व औषध प्रशासनाचे माजी आयुक्त श्री.महेश झगडे (सनदी अधिकारी) हे तत्कालीन आयुक्त असतांना त्यांनी बनावट व बोगस औषधी घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी सखोल चौकशी केली होती. सद्यस्थितीत ते निवृत्त झाले असुन पुणे येथे राहतात. सबब घोटाळ्याप्रकरणी सखोल चौकशी करणेस्तव आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती मिळविण्याचे सुध्दा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow