शिक्षकांनंतर आता आमदार प्रशांत बंब यांचा मोर्चा महापालिकेत...!
शिक्षकांनंतर आता आमदार प्रशांत बंब यांचा मोर्चा मनपाकडे...
आयुक्त, अतिरिक्त आयुक्त दालनांचा दुरुस्ती खर्च नियमानुसार नसल्याचा आरोप...चार तास ठिय्या दिला तरीही प्रशासन हलेना...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद ), दि.2(डि-24 न्यूज)
जिल्हा परिषद शिक्षकांनी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी व मुख्यालयी राहण्यासाठी गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांचा लढा सुरूच आहे. शिक्षकांनंतर त्यांनी आपला मोर्चा मनपाकडे वळवला अशी चर्चा आता शहरात सुरू झाली आहे. माहिती अधिकारात माहिती मिळत नसल्याने संतप्त आमदार प्रशांत बंब हे महापालिकेच्या मुख्यालयात धडकले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महापालिका आयुक्त व दोन्ही अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनांवर निविदा न काढताच दुरुस्ती व नुतनीकरणाचे काम करण्यात आले. या कामावर तब्बल दिड कोटींहून अधिकचा खर्च झाला असून या कामासाठी प्रशासक जी. श्रीकांत यांनी 67 (3) (क) या विशेष अधिकाराचा गैरवापर केला आहे असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केला. त्यासोबतच माहिती कायदा अधिकारात मगवलेली माहिती मिळत नसल्यामुळेच महापालिकेत यावे लागले, असेही ते म्हणाले.
भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी शहरातील विविध कामांबाबत सहा महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाकडून विविध कामांची माहिती मागविली होती. त्यासाठी माहिती अधिकारातून अर्ज सादर केला होता. मात्र, या अर्जाकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्षच केले. त्यामुळे गुरुवारी सकाळी दहा वाजताच आ. बंब हे महापालिकेत दाखल झाले. महापालिकेवर जेव्हापासून प्रशासक राज आले. तेव्हापासून प्रशसानाकडून अवास्तव खर्च केला जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाकडून पत्राद्वारे माहिती मागितली होती. मात्र ही माहिती न मिळाल्याने माहिती अधिकाराचा वापर केला. त्यातही माहिती देण्यास टाळाटाळच झाली.
महापालिकेकडून माहिती मिळत नसल्याने अधिकार्यांना फोनवर संपर्क साधला. त्यानंतरही माहिती मिळत नसल्यामुळेच महापालिका गाठावी लागली. सकाळी येताच अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, अद्याप माहिती गोळा करणे सुरू आहे, असे उत्तर त्यांनी दिले. महापालिकेत अनेक कामे नियमबाह्यरित्या झाल्याचे आरोप करीत आ. बंब म्हणाले की, महापालिका आयुक्तांना 67( 3) (क) नियमानुसार अत्यावश्यक सेवेच्या कामांना विना निविदा मंजूरी विशेष अधिकार आहेत. या अधिकाराचा गैरवापर करत आयुक्त व दोन्ही अतिरिक्त आयुक्तांच्या दालनांचे नूतनीकरण करण्यात आले. माहिती अधिकारात मागणी करुनही ही माहिती दिली जात नसल्याचा आरोप बंब यांनी केला. दोन अतिरिक्त आयुक्तांच्या दालनावर 77 लाख तर आयुक्तांच्या दालनावर 23 लाखाहून अधिक रुपयांचा खर्च निविदा न काढता केले.
बंगल्यावर दरमहा लाखोंचे साहित्य...
महापालिका प्रशासकांच्या शासकीय निवासस्थानावर दरमहा लाखोंचा खर्च होत आहे, असे सांगत आ. प्रशांत बंब यांनी माहिती अधिकारात मिळविलेली कागदपत्र दिली. त्यात प्रत्येक महिन्याला 2 ते 5 लाखांपर्यंत बंगल्यासाठी साहित्य खरेदी केले जाते. त्यात डिनरसेट, बेडशीट टॉवेल, अॅन्टीक फ्लोअर लॅम्प, डोअरमॅट, मॅट्रेस, चमचे, आरो यासह घरगुती साहित्य खरेदी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
माझ्यापर्यंत अर्जच आला नाही...
आमदार प्रशांत बंब यांनी काय माहिती मागितली, याबाबत काहीच माहिती नाही. त्यांनी जो अर्ज दिला. तो अद्यापही माझ्यासमोर आला नाही. माझ्या निवासस्थानी असो की, इतर कोणत्याही कामावर जर अनावश्यक खर्च केला असेल, त्याबाबत चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल. दालनांच्या दुरुस्तीचा खर्च नियमानुसार केले. तरीही तांत्रिक विभागाकडे याकामाच्या इस्टिमेटची माहिती घेण्यात येईल.
-जी. श्रीकांत,
प्रशासक तथा आयुक्त, मनपा.
What's Your Reaction?