पर्यटन वृद्धीसाठी आयटो प्रयत्नशील, शेवटच्या दिवशी आदित्य ठाकरे व डॉ.भागवत कराड

 0
पर्यटन वृद्धीसाठी आयटो प्रयत्नशील, शेवटच्या दिवशी आदित्य ठाकरे व डॉ.भागवत कराड

पर्यटन वृद्धीसाठी आयटो प्रयत्नशील, शेवटच्या दिवशी आदित्य ठाकरे, डॉ.भागवत कराड यांची उपस्थिती....

औरंगाबाद, दि.1(डि-24 न्यूज)

रविवारी 38व्या आयटो परिषद समारोपाच्या पहिल्या सत्रात ‘एक्सप्लोरिंग महाराष्ट्र -न्यू डेस्टिनेशन अँड अपॉर्च्युनिटी’ या विषयावर आमदार आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, ॲग्री टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक पांडुरंग तावडे, लेमन ट्रीचे संचालक विक्रम सिंग यांची उपस्थिती होती. श्री. ठाकरे म्हणाले, की देशात अनेक राजकारणी मंडळी इतिहासाला मोडत आहेत. मात्र, माझ्यासारखा तरुण युवक हा इतिहासाला प्रेरणा व एक संधी म्हणून पाहतो. यात 2020 ला पर्यावरण व पर्यटन मंत्री असताना पर्यटन संदर्भातील अनेक धोरण बदलण्याचा निर्णय घेतला. यामुळे कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात पर्यटनाला चालना मिळाली. यापुढे देशाची प्रगती करण्यासाठी पर्यटनक्षेत्र मदत करेल, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शहर आणि जिल्ह्यातील पर्यटन वृद्धीसाठी आयटो प्रयत्नशील 

- तीन दिवसीय वार्षिक परिषदेचा थाटात समारोप 

- ऑपरेटर परिसरातील ठिकाणे पाहण्यासाठी सज्ज

 शहरात सुरु असलेल्या तीन दिवसीय इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आयटो) च्या परिषदेचा समारोप रविवारी सायंकाळी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या दरम्यान पर्यटन वृद्धीसाठी आयटो प्रयत्नशील असल्याची ग्वाही संघटनेतर्फे देण्यात आली. 

या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, आयटोचे अध्यक्ष राजीव मेहरा, उपाध्यक्ष रवी गोसाईं, रजनीश कायस्थ, सचिव संजय राजदान, समन्वयक जसवंत सिंग, सुनीत कोठारी, विनय त्यागी, माजी अध्यक्ष प्रोनोब सरकार, जितेंद्र केजरीवाल यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. 

या कार्यक्रमात बोलताना डॉ. भागवत कराड म्हणाले, 'आपल्या देशातील वारसा प्रचंड आहे. अनेक आक्रमकांनी त्यावर प्रहार करून बरेच काही नष्ट केले. पण जे आहे ते दाखवण्यासाठी आमच्याकडे खूप आहे. देशाला पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यात पर्यटन क्षेत्राचा मोठा वाटा राहणार आहे. भविष्यात पर्यटन अधिक सोयीचे होण्यासाठी असलेल्या अडचणी दूर करण्यास आपण प्रयत्न करणार आहे'. 

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले, 'शहर आणि जिल्हा उद्योग क्षेत्रात पुढे गेले आहे. आता पर्यटनात पूढे जाण्याची वेळ आली आहे. येथे येण्याचा आग्रह ऑपरेटर्सनी आपल्या ग्राहकांना करावा. याच्याच माध्यमातून येथील पर्यटनाचा कालावधी अधिक दीर्घ होईल. या परिषदेचा एक अहवाल तयार करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तो सुपूर्द केला जाईल'. 

 आयटो अध्यक्ष राजीव मेहरा म्हणाले, 'या शहराला दोन विमानतळे आहेत. आयटोच्या वतीने औरंगाबाद, शिर्डी, नाशिकमधील वाईन उद्योग आणि त्र्यंबकेश्वरला प्राधान्य दिले जाणार आहे'. प्रधान सचिव (महाराष्ट्र पर्यटन) राधिका रस्तोगी यांनी ऑपरेटर्सना मुंबई येथील काला घोडा फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. 

समन्वयक जसवंत सिंग यांनी आयटो परिषद शहर व जिल्ह्यासाठी 'गेम चेंजर' ठरणार असल्याचे सांगितले. सध्या 3-4महिन्यांवर असलेला हा व्यवसाय या परिषदेनंतर अधिक वाढेल आणि वर्षभराचा होईल. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी वेरूळ येथील कैलास लेणी रात्री 10 वाजेपर्यंत उघडी ठेवावी अशी मागणी त्यांनी भाषणाचा समारोप करताना केली. 

अंतिम दिवसाची सुरुवात 5 किमी 'रन फॉर रिस्पॉन्सिबल टुरिजम'ने झाली. नंतर कनेक्टिव्हीटी (रेल, रोड, हवाई) या विषयावर तज्ज्ञांनी आपली मते मांडली. येथील पर्यटन अडचणी आणि त्यावरील उपायांवर सुनीत कोठारी यांनी संचलित केलेल्या सत्रात पालकमंत्री संदीपान भुमरे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, आणि पर्यटन संचालक बी. एन. पाटील यांनी आपली मते व्यक्त केली. 

विविध स्पर्धकांच्या आणि प्रायोजकांच्या सत्कार समारंभाने अंतिम दिवसाची सांगता झाली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow