निर्भय; निष्पक्ष निवडणूकांसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
निर्भय; निष्पक्ष निवडणुकांसाठी
सर्वांचे सहकार्य आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज):- विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व 9 विधानसभा मतदार संघात नामनिर्देशन दाखल करणे व त्याची छाननी प्रक्रिया होत असून निवडणूकीच्या पुढच्या टप्प्यांची तयारी सुरु आहे. मतदान हे निर्भय व निष्पक्ष वातावरणात व्हावे यासाठी निवडणूक यंत्रणा प्रयत्न करीत आहेच, त्यास सर्व मतदार, राजकीय पक्ष, उमेदवार, माध्यमे या सगळ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांची यावेळी उपस्थिती होती.
32 लाख 2 हजार 751 मतदार आणि 3273 मतदान केंद्र...
पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील निवडणूक पूर्व तयारीच्या अनुषंगाने माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात आता 30 ऑक्टोंबर 2024 अखेर 16 लाख 63 हजार 186 पुरुष 15 लाख 39 हजार 421 महिला व 144 इतर असे एकूण 32 लाख 2 हजार 751 मतदार आहेत. त्यांच्या मतदानासाठी जिल्ह्यात 9 सहाय्यकारी मतदान केंद्रासह 1290 शहरी तर 1983 ग्रामिण भागात असे एकूण 3273 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात 40 मतदान केंद्रांबाबत अधिक दक्षता घेण्यात येत आहे. तर 10 मतदान केंद्र हे संचारछाया क्षेत्रात आहेत.
वयोगटानुसार मतदार संख्या
जिल्ह्यातील मतदारांपैकी 18 ते 19 वर्षे वयोगटातील म्हणजे प्रथम मतदार हे 84 हजार 914 (2.65 टक्के) आहेत. 20 ते 29 वर्षे वयोगटातील 7 लाख 8 हजार 905 (22.13 टक्के) ,30-39 वर्षे वयोगटातील 7 लाख 85 हजार 697 (24.53 टक्के), 40 ते 49 वर्षे वयोगटातील 6 लाख 44 हजार 982 (20.14 टक्के), 50 ते 59 वर्षे वयोगटातील 4 लाख 72 हजार 544 (14.75 टक्के), 60 ते 69 वर्षे वयोगटातील 2 लाख 74 हजार 437 (8.60 टक्के), 79 ते 78 वर्षे वयोगटातील 1 लाख 51 हजार 232 (4.72 टक्के), 80 वर्षे व त्या अधिक 79 हजार 40(2.47 टक्के) मतदार आहेत.
4252 मतदारांचा गृह मतदानाचा पर्याय...
जिल्ह्यात 27 हजार 964 दिव्यांग तर 40 हजार 577 हे वयवर्षे 85 पेक्षा जादा वय असणारे मतदार आहेत. या मतदारांना फॉर्म 12 ड भरुन गृह मतदानाचा पर्याय निवडावयाचा असतो तर त्यातील 715 दिव्यांग व 3537 वयोवृद्ध मतदारांनी गृह मतदानाचा पर्याय दिला आहे. तसेच जिल्ह्यात 2508 सर्व्हिस मतदार आहेत.
20 हजार कर्मचाऱ्यांचे नियोजन
जिल्ह्यात मतदान प्रक्रियेसाठी 15 हजार 710 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून त्याचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यात 20 हजार 314 कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी 18 हजार 500 कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात 359 क्षेत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून राखीव 38 क्षेत्र अधिकारी मिळून 397 क्षेत्र अधिकारी सज्ज ठेवण्यात आले आहेत.
मतदान यंत्रांची सज्जता...
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यात 9 हजार 309 मतदान यंत्रे, 4 हजार 516 कंट्रोल युनिट, 4 हजार 610 व्हीव्हीपॅट यंत्रे सज्ज ठेवण्यात आले आहेत. या यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाली असून त्यांचे सरमिसळ करुन ही यंत्रे आता त्या त्या विधानसभा क्षेत्रात रवाना ही झाली आहेत.
398 उमेदवारांचे 522 अर्ज वैध...
नामनिर्देशन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजेच दि.29 ऑक्टोंबर पर्यंत जिल्ह्यात सर्व 9 विधानसभा मतदार संघ मिळून 437 उमेदवारांनी 613 अर्ज दाखल केले होते. छाननी अंती 398 उमेदवारांचे 522 अर्ज वैध ठरले आहेत.
निवडणूक आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टिने जिल्ह्यात 102 फिरते सर्व्हेक्षण पथके, 150 स्थिर सर्व्हेक्षण पथके, 46 व्हिडीओ सर्व्हेक्षण पथके व 13 व्हिडीओ पाहणी पथके तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
What's Your Reaction?