आपल्या देशाचा जिवंत असलेला आत्मा म्हणजे खरा हिंदूस्थान - पद्मभूषण जावेद अख्तर

या आपल्या देशाचा जिवंत असलेला आत्मा म्हणजे खरा हिंदुस्थान- पद्मभूषण जावेद अख्तर
वेरूळच्या निर्मितीतील लोकांच्या जिद्दीतील हजारावा भाग जरी आपल्यात आला तरी आपण या देशाला स्वर्ग बनवू- पद्मभूषण जावेद अख्तर
नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दूसरा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न...
औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) या आपल्या देशाची हजारो वर्षांची संस्कृती काही निवडणुकांमुळे आणि दोन – चार लोकांमुळे संपू शकत नाही. ती चालत आहे आणि कायम चालत राहील. या देशाचा एक आत्मा आहे ज्याला कोणीही मारू शकत नाही. आणि हाच जिवंत असलेला आत्मा म्हणजे खरा हिंदुस्थान असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण जावेद अख्तर यांनी यावेळी व्यक्त केले.
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजचा दूसरा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे ज्येष्ठ गीतकार व संवाद लेखक पद्मश्री जावेद अख्तर यांची आज दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी प्रकट मुलाखत घेतली. यावेळी गीतगार जावेद अख्तर बोलत होते.
पद्मभूषण जावेद अख्तर यावेळी म्हणाले, साठच्या दशकातील चित्रपटात टॅक्सी चालक, रिक्षावाला, कामगार, शिक्षक, प्राध्यापक, वकील अशा प्रकारचे काम करणारी मंडळी नायक होती. मात्र, आता चित्र पूर्णपणे बदलले आहे. आत्ताचे अभिनेते श्रीमंत घरातील असतात आणि ते काहीच काम करीत नाहीत. आजचा अभिनेता भारताचा विचार न करता थेट स्वित्झर्लंडच्या विचारात असतो. श्रीमंतांसाठी चित्रपट बनण्याचा हा काळ आहे. राजकीय विषय तर आपल्या चित्रपटात येताना दिसतच नाही. त्याचप्रमाणे सामाजिक विषय आता आपल्या चित्रपटात येताना दिसत नसून काम करणारा वर्ग आजच्या चित्रपटातून नाहीसा झाला आहे.
आपण स्वार्थी झालोय आणि दुसरीकडे आपल्याला देशाची खूप काळजी आहे, असे दाखवतो. आजपासून पन्नास वर्षापूर्वीच्या लोकांना काय या देशाबद्दल प्रेम नव्हते का ? आधीचे जे लोकं देशासाठी तुरुंगात गेले ते या देशावर प्रेम करीत नव्हते का ? त्यांचे देशावर प्रेम होते मात्र, इतकी नाटकं त्याकाळात होत नव्हती. आता जिकडे हवा आहे तिकडे लोक जाताना दिसत आहेत असे पद्मभूषण जावेद अख्तर यांनी यावेळी सांगितले.
पद्मभूषण जावेद अख्तर म्हणाले, पाठीमागील 30– 40 वर्षात बनलेला एक सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणजे ‘आर्टिकल 15’ हा चित्रपट होय. या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविला जातोय ही आनंदाची बाब असून सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा. असे चित्रपट साठच्या दशकात बनत नव्हते.
या जगात जे काही होते त्या पाठीमागे अर्थशास्त्र असते. हिंदुस्थान हा श्रीमंत देस असून त्याने खूप प्रगती केली आहे असे आपल्याला सांगितले जाते. आणि त्याबरोबर आपल्याला हेही सांगितले जाते की, या देशातील 80 कोटी नागरिकांना 5 किलो अन्नधान्य द्यावे लागते. ही कसली प्रगती आहे की, असा प्रश्न पद्मभूषण जावेद अख्तर यांनी उपस्थितांना विचारला.
पद्मभूषण जावेद अख्तर म्हणाले, भाषा कायम आपल्या सोबत असते. भाषेमध्ये आपली संस्कृती दिसते. भाषा सोडली की आपण आपली मुळं सोडली असा त्याचा अर्थ आहे. भाषा एकमेकांसाठी बोलण्यासाठी होती पण आज भाषेमुळे बोलणे बंद होण्याची वेळ आली आहे.
वेरुळला मी आज पहिल्यांदा गेलो. हे सगळे वैभव पाहून मी मनापासून भारावून गेलो. मी आत्तापर्यंत का आलो नाही, असा प्रश्न मला आज पडला. हे ज्या लोकांनी काम केले आहे ते पैसे घेऊन केलेले नसेल. हे काम करण्यासाठी खूप अधिक कोणत्यातरी गोष्टीवर दृढ विश्वास असायला हवा. विशेषत: हे काम जय जिद्दीने पूर्ण झाले आहे, त्या जिद्दीतील हजारावा भाग जरी आपल्यात आला तरी आपण या देशाला स्वर्ग बनवू शकतो. हे ज्यांनी बनवले आहे, त्यांच्या अनेक पिढ्यांनी यासाठी काम केलेले असून प्रेम, संस्कार, संस्कृती आणि एका वचनबद्धतेतून याची निर्मिती झाली आहे. मी पुनः आणखी येणार असून माझे अजिंठा पान पहायचे राहिले असल्याचे पद्मभूषण जावेद अख्तर यावेळी म्हणाले.
यावेळी, प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सव संचालक अशोक राणे, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, साहित्यिक दासू वैद्य व सर्व संबंधित उपस्थित होते.
दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या मास्टर क्लासला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात अतिशय सुदंर पद्धतीने झाली आहे. पद्मश्री जावेद अखतर, दिग्दर्शक अनुभव सिन्हा, दिग्दर्शक आर बाल्की यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीमध्ये आजचे कार्यक्रम पार पडले. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला आपली उपस्थिती दर्शवलेली आहे.
पा, चिनी कम, घुमर, शामीताभ, पॅडमॅन या प्रसिध्द हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक आर.बाल्की यांच्या मास्टर क्लासचे आज दुपारी 2.30 वाजता आयोजन करण्यात आलेले होते. दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग यांनी त्यांना प्रश्न विचारले. तत्पूर्वी आर बाल्की यांचा नुकताच प्रसिध्द झालेला घुमर या चित्रपटाचे स्क्रिनिंग सुद्धा महोत्सवात पार पडले.
आर बाल्की यांनी चित्रपटाचे खरे रूप कसे असावे यावर भाष्य करीत, जो चित्रपट प्रेक्षकांच्या मनामध्ये उतरून समाजामध्ये कल्याणाचे कार्य करेल तोच खरा चित्रपट आहे अशी भूमिका यावेळी मांडली. आर बाल्की यांनी आपल्या अनुभवाचे धडे देत एका चित्रपटाचे निर्माण कार्य स्पष्ट करत त्यामध्ये कशा प्रकारच्या अडचणींचा सामना एका दिग्दर्शकाला करावा लागतो, हे देखील स्पष्ट केले. चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एका दिग्दर्शकाची, निर्देशकाची तसेच संपूर्ण टीमची जबाबदारी काय असते, ते देखील स्पष्ट केले.
उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी झालेल्या जावेद अख्तरांच्या भाषणाला समजून घेणे सध्याच्या परिष्टितीत का आवश्यक आहे हे स्पष्ट केले. युवकांमध्ये किती शक्ती आहे आणि आजच्या समाजाला संवेदनशील न राहता योग्य चित्रपट कसा असतो ते समजून घेणे आवश्यक आहे हे देखील स्पष्ट केले. अशाप्रकारे युवा पिढीला मोलाचा संदेश देऊन आर बाल्की यांनी आपल्या मास्टर क्लास ची सांगता केली.
What's Your Reaction?






