नवरात्र, उत्सव स्त्री शक्तीचा उत्सव जीवनात सकारात्मक निर्माण करतात - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
नवरात्र, उत्सव स्त्री शक्तीचा उत्सव जीवनात सकारात्मकता निर्माण करतात-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.9(डि-24 न्यूज) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जीवन काही बाबतीत गुंतागुंतीचे होताना दिसत आहे या वर मात करण्यासाठी उत्सव जीवनात सकारात्मकता निर्माण करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
"नवरात्र, -उत्सव स्त्री शक्तीचा" या कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात 'महिलांसाठी आर्थिक साक्षरता' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याते म्हणून जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, यांनी महिलांना आर्थिक गुंतवणूक यातील फायदे आणि धोके यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर ,उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासनाच्या संगीता राठोड, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र देसले, जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्रीमती रेशमा चिमंद्रे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या प्रकल्प अधिकारी, भारती सोसे, जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व विविध शासकीय कार्यालयातील, महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की सध्या जवळपास सर्वांचा जास्तीत जास्त वेळ हा समाज माध्यमाच्या (सोशियल मिडिया) चा वापरात जात आहे. यामुळे नवीन लिखाण, वाचन किंवा छंद जोपासले जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. विविध आव्हानामुळे समाजात नकारात्मकता जास्त प्रमाणात आढळून आल्याचे दिसते. यावर मात करण्यासाठी नवरात्र सारख्या उत्सवातून विविध सांस्कृतिक, कार्यक्रमाच्या आयोजनातून चैतन्य निर्माण होत असते, त्यासाठी नवरात्र उत्सव हा सृजनात्मकतेने काही तरी नवीन शिकणे, कौशल्ये आत्मसात करत सुरवात करण्यासाठी उत्सव महत्वपूर्ण असल्याचे स्वामी यांनी सांगितले.
"महिलांची आर्थिक साक्षरता" या विषयावर मार्गदर्शन करताना मंगेश केदार यांनी विविध पेन्शन योजना, विमा योजना, यामध्ये असणारी आर्थिक गुंतवणूक व या गुंतवणुकीचा, वेळ , वयानुसार होणारा उपयोग याविषयी मार्गदर्शन केले. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत आर्थिक नियोजन करत असताना कोण- कोणत्या बाबींमध्ये आर्थिक गुंतवणूक करणे योग्य असून कमी जोखीम असलेल्या विविध योजना विषयी त्यांनी मार्गदर्शन केले. एनपीएस मिशन वात्सल्य , रोख ठेवी, जीवन विमा यामधील गुंतवणूक आरोग्य विमा, गृह कर्ज ,वाहन कर्ज व यावरील व्याजदर, सिबिल स्कोर व यावरील बँकेमार्फत मिळणारे विविध फायदे, गुंतवणूक करताना कोणत्या ॲपचा वापर करणे आवश्यक आहे याविषयीचे मार्गदर्शन केदार यांनी केले. कर्जदार कर्ज घेत असेल तर त्यावेळेस जामीनदार होताना घ्यावयाची काळजी, व्याजदर आणि रेपो रेट या दरम्यानचा फरक , आणि ते परस्पर कसे अवलंबून आहेत , याविषयी मार्ग दर्शन केले. बँक आणि ग्राहक यामध्ये असणारा बँकिंग क्षेत्राविषयीचा व्यवहार . बचत खाते आणि गृह कर्जचे खाते हे एकाच ठेवले तर आर्थिक फायदा कर्ज घेणाऱ्यास कसा होऊ शकतो याविषयी मार्गदर्शन केले. केंद्र शासन आणि राज्य शासनामार्फत महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी कोणकोणत्या योजना फायदेशीर असून याची अंमलबजावणी होत असल्याचे सांगितले. यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, जीवन ज्योती बिमा योजना, अटल पेन्शन अंतर्गत कौटुंबिक पेन्शन योजना याचे लाभ याची सविस्तर माहिती मंगेश केदार यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अखेरीस प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम घेऊन उत्तर देणा-यांना महिलाना भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती जोशी यांनी केले.
What's Your Reaction?