संतपिठाचा नावलौकिक रास्ट्रस्तरावर पोहोचेल- पालकमंत्री संदीपान भुमरे
संतपीठाचा नावलौकिक राष्ट्रस्तरावर पोहोचेल
- पालकमंत्री संदिपान भुमरे
- संतपीठाचा दुसरा प्रमाणपत्र वितरण सोहळा थाटात
पैठण/औरंगाबाद,दि.16(डि-24 न्यूज) महाराष्ट्रातील पहिले संतपीठ सुरु होण्याचा मान संत एकनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या क्षेत्र पैठणला मिळाला. अवघ्या दोन वर्षातच संत साहित्याचे राज्याबाहेरील अभ्यासक या ठिकाणी अध्ययन करीत आहेत. या संतपीठाचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर पोहेचला, असा विश्वास पालकमंत्री संदीपान भूमरे रोहयो व फलोत्पादनमंत्री यांनी व्यक्त केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित श्रीक्षेत्र पैठण येथील संतपीठाचा दुसरा प्रमाणपत्र वितरण सोहळा शनिवारी (दि.१६) थाटात संपन्न झाला. नाथसागराच्या पायथ्याशी असलेल्या संतपीठाच्या इमारतीत कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. यावेळी यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, समन्वयक डॉ.प्रवीण वक्ते, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.अपर्णा पाटील, नितीन जाधव, श्रीमती ज्योती येवले, माजी उपमहोपौर संजय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दोन बॅचमधील 159 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. उपस्थितांना श्री.भुमरे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मराठवाडयातील चाळीस वर्षापासूनची संतपीठाची मागणी पूर्ण झाली. विशेषतः कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी शासनाच्या प्रतिसादास सकारात्मक प्रतिसाद दिला.त्यामुळे संतपीठाचा प्रकल्प मार्गी लागला. मंत्री उदय सामंत व चंद्रकांतदादा पाटील यांची भुमिका यात महत्वाची ठरली.
मराठवाडयाला मोठी संत परंपरा लाभली असून सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांचे विचार जतन केले पाहिजे. तसेच संतपीठाला कुशल मनुष्यबळ व पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहु,असे त्यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी दोनशे कोटीचा निधीसह पैठण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व विविध प्रकल्पाबद्दल ही त्यांनी माहिती दिली. संतपीठाचे पालकत्व आपण स्विकारण्यास आपण तयार असून शासनस्तरावरही पाठपुरावा करु असेही भुमरे म्हणाले.
संतपीठाला स्वायत्तता देण्याची गरज-.कुलगुरु
चार दशकांपासून प्रलंबित संतपीठ सुरु करण्याचे भाग्य मला लाभले. अवघ्या दोन वर्षात देशभर संतपीठाचे नाव पोहचले. संतपीठाला स्वतंत्र विद्यापीठ म्हणून मान्यता मिळावी, असे आपले स्वप्न आहे. याठिकाणी पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रम, पीएची.डी संशोधनाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, या कामी संदीपान भुमरे यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले. मराठवाडा ही संताची भुमी असून या ठिकाणीच संतपीठ सुरु होणे हा सार्थकी निर्णय आहे. पीएच.डी, नेट-सेट घेऊन संत साहित्याचा अभ्यास करणारे तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध झाले, असेही डॉ.येवले म्हणाले. आजच्या धकाधकीच्या जीवनांत माणूस आनंदी राहण्यासाठी संत साहित्याचा अभ्यास गरजेचे आहे, असे प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ म्हणाले.
संत साहित्याच्या अभ्यासकांचा आकडा पाचशेपार
संतपीठाच्या दुस-या व तिस-या बॅचचा प्रमाणपत्र वितरण सोहळा आज झाला. यावेळी 159 जणांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. चौथ्या बॅचपर्यंत विद्यार्थ्यांची संख्या पाचशेवर पोहचली आहे, अशी माहिती डॉ.प्रवीण वक्ते यांनी दिली. यामध्ये तुकाराम गाथा ग्रंथ परिचय 118, श्री.ज्ञानेश्वरी 150, एकनाथी भागवत 66, वारकरी संप्रदाय 91, महानूभव संप्रदाय 75 असे एकूण पाचशे विद्यार्थी प्रवेशित झाले संतसाहित्याचा अभ्यास केला आहे. समन्वयक डॉ.प्रवीण वक्ते यांनी प्रास्ताविक केले. डॉ.चक्रधर कोठी यांनी सूत्रसंचालन तर कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी आभार मानले. संतपीठातील अध्यापक डॉ.राधाकृष्ण अकोलकर, डॉ.जालिंदर येवले, डॉ.सुभाष खेत्रे, डॉ.भाऊसाहेब नेटके, डॉ.अरुण वाकळे, डॉ.प्रणिता देशपांडे, भारत मिसाळ, अनुराधा पिंगळीकर, गणेश मानपुरे यांनी सोहळयाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
पालकमंत्र्याच्या हस्ते कुलगुरुंचा निरोपानिमित्त सत्कार
पालकमंत्री संदिपान भूमरे यांच्या हस्ते कुलगुरु डॉ.प्रमोद येवले व श्रीमती ज्योती येवले यांचा सत्कार करण्यात आला. संतपीठाच्यावतीने डॉ.येवले यांना निरोप देण्यात आला.
What's Your Reaction?